
संगमनेरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत जिल्हा बँकेच्या विविध सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
रणजितसिंह देशमुख हे बाळासाहेब थोरात यांचे जावई असून, यापूर्वी त्यांनी महानंद दूध संस्थेचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सुजय विखे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीतील सुजय विखे यांनी थोरातांना वाकून नमस्कार केल्याचे दृश्यही चर्चेत आले.
आता प्रश्न एकच—जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? देशमुख यांच्या उमेदवारीमुळे थोरात कुटुंबाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा अध्यक्षपदाची चर्चा रंगली आहे.





