
खतासाठी कृषी सेवा केंद्राच्या वारंवार चकरा मारण्याची कटकट आता संपणार आहे ! शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोबाईलवरून खत खरेदीची नवी सुविधा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे.
‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या ॲपच्या वापराबाबत कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी ॲपमध्ये फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे लॉगिन केल्यानंतर त्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ दिसणार आहे. त्यानंतर पिकाची निवड केल्यावर संबंधित पिकासाठी आवश्यक खताची मात्रा समजणार आहे.
विशेष म्हणजे, तालुक्यातील कोणत्या कृषी सेवा केंद्रावर कोणते खत आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची माहिती मोबाईलवर पाहता येणार आहे. यात शेतकरी आपल्या सोयीचे केंद्र निवडून घरबसल्या खरेदीची प्रक्रिया करू शकतील.
खरीप हंगामात खतासाठी होणारी गर्दी, धावपळ आणि अनावश्यक चकरा कमी करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. तसेच खतांच्या उपलब्धतेत पारदर्शकता आणण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.





