अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका एका धक्कादायक घटनेने हादरलाय. नातवाने आजोबांवर थेट गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आलीये. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
दगडू गंगाराम कोहकडे हे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी बाळेश्वर डोंगर परिसरात गेले होते. याचवेळी त्यांचा चुलत नातू प्रवीण बाबासाहेब कोहकडे मोटारसायकलवरून तेथे पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या भावकीच्या वादातून आणि स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या कारणावरून प्रवीण याने आजोबांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या प्रवीणने गावठी कट्ट्यातून थेट आजोबांच्या छातीवर गोळी झाडली.
गोळी लागताच दगडू कोहकडे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी प्रवीण कोहकडे घटनास्थळावरून फरार झाला. मंडळी, कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे अत्यंत धक्कादायक उदाहरण मानले जात आहे.





