
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा सुरू होती. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २४ ते २५ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो.
मंडळी, यंदा मान्सूनने दक्षिण महाराष्ट्रात वेळेत हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर त्याची पुढची वाटचाल मंदावली आणि अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नाही.
४ जून ते १८ जून या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४१ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
सध्या मान्सूनची उत्तर सीमा दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांवर स्थिर आहे. मात्र पुढील काही दिवसांत परिस्थिती बदलण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२२ जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात सर्वदूर किंवा अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
मात्र २४ आणि २५ जूनपासून चित्र बदलू शकते. हवामान मॉडेल्सनुसार कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ ते २८ जून दरम्यान किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.





