
सव्वा वर्षात उत्पन्न शून्य, पण बाजार समितीने मोजले तब्बल पावणेचार लाख रुपये भाडे ! नेमकं मोर्वीस उपबाजार समितीत काय घडलंय ? जाणून घेऊयात.
मंडळी, कोपरगाव तालुक्यातील मोर्वीस (धामोरी) येथील उपबाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काळे गटाचे उपसभापती आणि सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याला आता शेतकरी वर्गातूनही समर्थन मिळत आहे.
माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी आरोप केला आहे की, आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या उपबाजार समितीचे भूमिपूजन होऊन सव्वा वर्ष उलटले, तरी शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही. त्यांच्या मते, सभापती साहेबराव रोहोम यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
मोर्वीस येथे समितीसाठी ६ एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, दरवर्षी सुमारे ३ लाख रुपये भाडे दिले जाते. सव्वा वर्षात जवळपास पावणेचार लाख रुपये खर्च झाले, मात्र एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच पश्चिम भागातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या हितासाठीच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे काळे गटाने म्हटले आहे. या वादावर तुमचे मत काय?





