
गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावातील हनुमान मंदिराच्या विकासासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयाचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील शिरापूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. त्यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी किशोर महाराज कोकाटे शरद पारासुर, संदीप वर्पे, आकाश पवार, अविनाश पांडे, छगन पांडे, विजय पारासुर, भीमराज पांडे, सुशील पारासुर, गणेश पारासुर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, महाराष्ट्राची आणि भारताची ओळख संत-महंत, अध्यात्म आणि हिंदू संस्कृतीच्या महान परंपरेमुळे जगभरात निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांनी या भूमीला मोठी वैचारिक आणि सांस्कृतिक उंची दिली. आज देश-विदेशातून अनेक लोक महाराष्ट्रात येऊन येथील अध्यात्म, परंपरा आणि धार्मिक स्थळांचा अनुभव घेत आहेत.
पंढरपूरच्या वारीमध्ये यावर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. एवढ्या मोठ्या यात्रेचे नियोजन, स्वच्छता आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने कोणतीही कमतरता भासू दिली नाही.
शिरापूर गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, गावातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ट्रान्सफॉर्मर ही बसविण्यात आले आहेत. गेल्या एक ते दीड वर्षात गावातील विकास कामांसाठी आतापर्यंत सुमारे ८३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. इथून पुढेही तुम्ही निधीची अजिबात काळजी करू नका निधी देऊन आपण कोणावरही उपकार करत नाही. विकासकामे करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मानून आपण काम करत आहोत. आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांमुळे अन लोकांची कामे करण्याची संधी जनतेने दिल्यामुळे हे कर्तव्य पार पाडत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
धार्मिक कार्यक्रम, यात्रा, सप्ताह आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येते. त्यामुळे मंदिरासमोर सभामंडपाची आवश्यकता आहे. मंदिराचा कळस उभारण्याचे काम ग्रामस्थांनी करावे. सभामंडपासाठी आवश्यक निधीची काळजी करू नका. आमदार निधीतून उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार सभामंडपाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ.





