
पशुपालकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलीये. आता चारा आणि बियाणे मोफत मिळणार आहेत. तेही शंभर टक्के अनुदानावर. मंडळी, यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढच्या काळात हिरवा चारा आणि पशुखाद्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने महत्वाची योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत मका, ज्वारी, बाजरी आणि नेपिअर गवत यांसारख्या वैरण पिकांचे बियाणे पशुपालकांना मोफत दिले जाणार आहे. हे बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रति शेतकरी एक हेक्टर क्षेत्रासाठी चार हजार रुपयांच्या मर्यादेत मदत मिळणार आहे.
महत्वाचं म्हणजे, ही योजना ‘प्रथम अर्ज प्रथम पुरवठा’ या तत्त्वावर राबवली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, सातबारा, ८-अ, जनावरांचे टॅग क्रमांक, बँक पासबुक झेरॉक्स, अपत्य प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला अशी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
ज्या पशुपालकांची पशुधन नोंद पोर्टलवर आहे आणि जे नोंदणीकृत दुग्ध उत्पादक आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मंडळी, ही माहिती इतर पशुपालकांपर्यंत नक्की पोहोचवा.





