Latest

आधी जेसीबीने घर पाडले, त्यानंतर गोळीबार केला… अहिल्यानगरमधील ‘या’ गावात थरार

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक थरारक घटना घडली आहे. शेतातील तारेच्या कुंपणाच्या वादातून एका कुटुंबाचे घर जेसीबीने पाडण्यात आले आणि त्यानंतर थेट गोळीबार करण्यात आलाय.

ही घटना वाडेगव्हाण गावात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप काकडे, त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले शेतातील घरी असताना अचानक काही जण तेथे आले. शेतात तारेचे कुंपण लावण्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला.

फिर्यादीनुसार, वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने घराच्या दोन खोल्या पाडण्यात आल्या. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. एका आरोपीने धमकी देत थेट पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी संदीप काकडे यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या सर्वांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत चारचाकी वाहन, दुचाकी, ट्रक आणि जेसीबीचा वापर झाल्याची माहितीही समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button