
शेवगावमध्ये किरकोळ वादातून बाप-लेकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. वरूर चौक–आखेगाव रोड परिसरात १५ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मच्छिंद्र कोरडे आणि त्यांचा मुलगा परशुराम यांच्यासोबत काही जणांचा किरकोळ वाद झाला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याचवेळी रोहन फडके याने चाकूने मच्छंद्र कोरडे यांच्या पोटावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, अहिल्यानगरमधील साईदीप रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी माजी उपसभापती संजय फडके, रोहन फडके, ओम वाळके, राजू धनवडे आणि कृष्णा धनवडे यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे.





