Explained

Explained : Nilesh Lanke | राणी लंके जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतील की नाही, हीच शंका…

Explained : पारनेरचं राजकारण गेल्या वर्षभरात दोनदा बदललं. आमदार असलेले निलेश लंके खासदार झाले. त्यावेळी या तालुक्याने महाविकास आघाडीला कौल दिला. त्यानंतर पुढच्या सहाच महिन्यांत, निलेश लंके यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं. सध्या पारनेर तालुक्यात निलेश लंके विरुद्ध सगळे असेच चित्र आहे. त्यातच विधानसभेला अनपेक्षित पराभव झाल्यानंतर, आता त्यांच्या पत्नी राणी लंके या जिल्हा परिषद निवडणूक लढविणार का? हा प्रश्न आहे. परंतु या पराभवातून धडा घेत निलेश लंके हे आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेला उभेच करणार नाहीत, असाही सूर उमटू लागला आहे. नेमकं कसं आहे पारनेरचं चित्र? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत निलेश लंके यांनी बाजी मारली. महायुती असूनही विखेंना केलेला विरोध, त्यानंतर पक्ष बदलून केलेली उमेदवारी, यामुळे लंकेंची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली. सामान्य उमेदवार म्हणून लंकेंनी बाजीही मारली. परंतु त्यानंतर हळूहळू त्यांचं होमग्राऊंड असणाऱ्या पारनेरचं राजकारण बदलत गेलं. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यासाठी जिवाचं रान केलं होतं. लोकसभेच्या बदल्यात पारनेरची विधानसभेची जागा ठाकरे गटाला देण्याचा शब्द स्वतः लंकेंनी दिलाय, असं ठाकरे गटाने भर स्टेजवर सांगितलं. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी लंकेंनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे वातावरण फिरलं. सोबत असणारा ठाकरे गट नाराज झाला. एकाच घरात खासदारकी व आमदारकी मान्य नसलेला त्यांच्या स्वतःचा गटही नाराज झाला. एकाच गटात दोन्ही उमेदवाऱ्या केल्याने लंकेंही घराणेशाही चालवत असल्याचा सूर त्यावेळी आळवला गेला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पारनेरमध्ये लंके यांची पिछेहाट झाली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसांत वातावरण फिरले. शिवाय लोकसभा निवडणुकीवेळी ज्यांनी लंकेंना डोक्यावर घेतलं होतं, तेही लंकेंची कार्यशैली पाहून काहीसे नाराज दिसले. त्याऊलट स्वतः अजित पवार व माजी खा. सुजय विखेंनी पडद्यामागून यशस्वी डाव टाकले. माजी आ. विजय औटींच्या उमेदवारीने लंकेंची अडचण होईल, हे विखे-पवारांनी जाणले. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रचार न करता, लंकेंच्या इतर विरोधकांना एकत्र करण्याचे काम झाले. त्यात माजी नगराध्यक्ष विजय औटी, त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, राहुल शिंदे आदींना एकत्र आणण्याचा डाव खेळला गेला. तो प्रचंड यशस्वी ठरला. सगळ्यांची मनधरणी करुन अजित पवारांनी काशिनाथ दातेंना रिंगणात उतरवलं. इकडे सुजय विखेंनी परफेक्ट चाली खेळल्या. मतदान होईपर्यंत सर्व विरोधकांना एकत्र ठेवण्याचा डाव विखेंनी परफेक्ट साधला. शिवाय लंकेंच्या ताकदीचा अंदाज घेऊन, शिवसेनेच्या संदेश कार्ले यांच्या उमेदवारीबाबतही मौन बाळगले. यामुळे केवळ जिल्हा परिषद सदस्य असलेल्या काशिनाथ दातेंचा विजय झाला. खासदार पत्नी असलेल्या राणी लंके यांना अनपेक्षित पराभव पहावा लागला.

या पराभवानंतर लंके काहीसे नाराज दिसले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. राणी लंके यापूर्वी ज्या सुपा जिल्हा परिषद गटातून सदस्य होत्या, त्या गटाचे आरक्षणही त्यांच्याच सोयीचे निघाले. लंके यांच्याकडे ओबीसी सर्टीफिकेट असल्याचे सांगितले जाते. सुपा गटात ओबीसी महिलेला संधी मिळणार आहे. त्यामुळे राणी लंके या तेथूनच पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवतील का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्यावेळी एकाच घरात दोन पदे नको म्हणून पारनेरकरांनी राणी लंके यांना विधानसभेला नाकारलं. परंतु आता पुन्हा एकदा राणी लंकेंना सुपा गटातून संधी मिळाली तर नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या बाजूने विचार केला तर, विधानसभेला पराभूत झालेल्या राणी लंकेंना खा. निलेश लंके हेच जिल्हा परिषदेला उभं करणार नाहीत, असाही सूर काढला जात आहे. कारण विधानसभेला उभं केल्यानंतर त्या पुन्हा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करतील, असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा थेट खा. सुप्रिया सुळेही राणी लंके यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देतील, अशी शक्यता वाटत नाही. खरंतर खा. निलेश लंके हे काही दिवसांपासून शरद पवार गटाचे राज्यातील प्रमुख नेते झाले आहेत. त्यामुळे जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राणी लंके यांना काही अडचणी आल्या तर खा. निलेश लंके यांची राज्यातील प्रतिमा खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, माजी सभापती गणेश शेळके यांच्या पत्नी सुषमा शेळके यांची या गटांत चर्चा आहे. शिवाय विखेंचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांच्या पत्नी प्रियंका शिंदे यांचीही येथे चर्चा आहे. राहुल शिंदे यांच्याकडे कुणबी दाखला आहे की नाही? यावर या चर्चा थांबल्या आहेत. कदाचित विखेंच्या ग्रीन सिग्नलनंतर सुपा गटाचे चित्र स्पष्ट हेईल, असेही सांगितले जात आहे. याच गटांत तेजश्री थोरात यांच्याही नावाची चर्चा आहे.

काहीही असले तरी, राणी लंके यांनी उमेदवारी केली तर सुपा जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही सुपरहाँट ठरेल हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button