Explained

Explained : Shivaji Kardile | दुग्धव्यवसायिक ते मंत्री, कर्डिलेंनी राजकारणातले सुपर हिरोच होते…

माजी मंत्री व राहुरी विधानसभेचे विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अफाट जनसंपर्क असलेला नेता जिल्ह्यानं गमावला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बुऱ्हानगर अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हा शोकसागरात बुडाला.

आ. शिवाजी कर्डिले यांचा जिवनप्रवास हा प्रेरणादायीच राहिला. साधा दुग्धव्यवसायिक ते मंत्री असा त्यांचा प्रवास नगरच्या राजकारणातले सुवर्णपान होते. एक दोन नाही तर तब्बल सहा वेळा त्यांनी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढवली व मिळवली. आपल्या राजकीय प्रवासात शिवसेना वगळता त्यांनी इतर सर्व पक्षांचा राजकीय झेंडा खांद्यावर घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी माजीमंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपरेंचा दणदणीत पराभव केला होता.

शिवाजी कर्डिले हे नगरपासून जवळ असलेल्या बुऱ्हाणनगर येथील रहिवासी. दूध विक्रीसाठी नगर शहरात येत त्यांनी जनसंपर्क जमवला. त्यातूनच अपघाताने त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. बाणेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गावात सार्वजनीक वाचनालय सुरु केले. त्यानंतर गावाचे सरपंचही झाले. याच काळात त्यांना आमदार होण्याची संधी मिळाली. काँग्रेसचे दादा पाटील शेळके हे खासदार झाल्याने काँग्रेसने विजया कुटे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी स्थानिक नेत्यांना विजया कुटे यांची उमेदवारी मान्य नव्हती. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली. या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

जमिनीचे व्यवहार, बांधकाम साहित्याचा पुरवठा, हाँटेल उद्योग या व्यवसायतही कर्डिले यांनी जम बसविला होता. अपक्ष, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी, त्यानंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. नेवासा, नगर व राहुरी अशा अनेक मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. तब्बल सहा वेळा त्यांनी आमदारकीला गवसणी घातली. याच कर्डिलेसाठी 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः राहुरीत येत सभा घेतली होती. या सभेचीही त्यावेळी चांगलीच चर्चा झाली. खरंतर त्यानंतर नगर जिल्ह्यात भाजपने बस्तान बसविले, असे सांगितले जाते. म्हणजेच नगर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होण्यास शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी घेतलेली राहुरीतील सभाच खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली.

शिवाजी कर्डिलेंचे नातेगोतेही राजकारणात आहे. कर्डिले, कोतकर, गाढे या गणगोतांनी नगर शहर व नगर तालुक्यात राजकीय बस्तान बसविलेले आहे. कर्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर होते. कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि नगरसेविका होत्या. कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका होत्या. कर्डिले यांची तिसरी मुलीगी ज्योती अमोल गाडे याही नगरसेविका होत्या. कर्डिलेंच्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची राजकारणात नेहमीच चर्चा असते. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा सर्वच निवडणुकांत कर्डिलेंनी मोलाची भूमिका निभावली. सध्या राहुरीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. या नगरी हिऱ्याला अहिल्यानगर लाईव्ह 24 ची भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button