Explained

Explained: नगर-मनमाड, नगर-संभाजीनगर रस्ता लवकरच होणार, काय आहे नेमके विघ्न..?

नगर- मनमाड व नगर-संभाजीनगर हे दोन्ही महामार्ग नगरला इतर जिल्ह्यांशी व राज्यांशी जोडतात. त्यामुळे हे दोन्ही महामार्ग जिल्ह्याची धमनी समजले जातात. मराठवाडा-विदर्भातील लोकांना पुण्या-मुंबईला जायचं असलं तर, नगरहूनच जावं लागतं. एवढंच कशाला, नाशिक जिल्ह्यातील दिंड्यांना विठुरायाचं दर्शनही याच दोन महामार्गावरुन गेल्यावर घडतं. आता एवढे महत्त्वाचे म्हटल्यावर हे महामार्ग कसे असायला हवेत..? तर, एकदम टरारबुंग… पण या दोन्ही रस्त्यांचं ग्रहण सुटता सुटत नसल्याचं दिसतंय. चांगल्या रस्त्यांच्या प्रतिक्षेत किमान दोन पिढ्या ईहलोकात गेल्यात. या रस्त्यांनी कित्येकांचे बळी घेतलेत. कित्येकांना कायमचं जायबंदी केलंय… पण तरीही या रस्त्यांच्या दुरूस्तीचं कुणीच मनावर घेत नव्हतं. आता दोन दिवसांपूर्वी, नगर-वडाळ्यापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचा आदेश काढण्यात आल्याची माहिती, नेवाशाचे आ. विठ्ठल लंघे यांनी दिली. त्यापूर्वी नगर-मनमाड रस्त्याचं कामही सुरु झाल्याच्या बातम्या आल्या. म्हणजेच हे होन्ही रस्ते टकाटक होऊन, 2026 नंतर नगरकरांचा प्रवास सुखाचा होईल, अशा चर्चा सुरु झाल्या. नेमकं काय सुरु आहे, या दोन्ही रस्त्यांचं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमत्री आहेत. ते अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांनी शिरुर ते पुणे या रस्त्यासाठी 8 हजार कोटींच्या तीन निविदा खुल्या केल्याची बातमी गेल्या आठवड्यात आली. खरं तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता तीन टप्प्यांत विभागला गेलाय. त्यामुळेच या रस्त्याच्या कामाला व त्याच्या हस्तांतरणाला अडचणी येतात, असं सांगितलं जातं. हा संपूर्ण रस्ता एमएसआयडीसीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातल्या शिरुर ते पुणे या 54 किलोमिटरच्या रस्त्याच्या निविदा खुल्या झाल्या. येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळेल व तो रस्ता सुरुही होईल. आता प्रश्न उरतो तो शिरुर ते नगर व देवगड ते संभाजीनगर रस्त्यांचा… या दोन्ही रस्त्यांवर सध्या टोलवसुली सुरु आहे. त्यामुळे ही टोलवसुली जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच हा रस्ता एमआयडीसीकडे हस्तांतरीत होईल.

आता प्रश्न उरतो तो नगर ते देवगड रस्त्याचा… हा रस्ता प्रचंड खराब झालाय. एतका खराब झालाय की, या 50 किलोमिटर अंतराला तब्बल दोन ते तीन तांस लागतात. वडाळा ते नगर या रस्त्यावर तर दुचाकी चालवणेही जिकरीचे झालेय. रोज खड्ड्यात कोठे ना कोठे अपघात होताहेत. याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नेवाशाचे आ. विठ्ठल लंघे हे गेल्या आठवड्यात थेट बांधकाममंत्र्यांकडे गेले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन घेतला. बांधकाम मंत्र्‍यांनीही रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीला मंजूरी दिली. त्यांनीही अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर फोनवर चर्चा करुन निधी मंजूर करुन घेतला. त्यामुळे हा रस्ता आता लवकरच खड्डेमुक्त होईल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत.

त्यापूर्वी नगर-मनमाड रस्त्याच्या कामासही सुरुवात झाली. पुढच्या वर्षी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी-शनिशिंगणापूर हा रस्ता होणार आहे. या रस्त्यासाठीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून 515 कोटी रुपये मिळाले आहेत. या रस्त्याचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे सावळीविहीरपर्यंत हा रस्ताही पूर्ण होणार आहे.

हे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक पाहता, रस्त्यांवरुन रोज किमान हजारो वाहने ये-जा करतात. गुजरात. एमपी, यूपीवरुन दक्षिण भारतात जाणारी जड वाहतूकही या रस्तावरुनच जाते. त्यामुळे हे रस्ते लवकर खराब होतात. या रस्त्याचे भुसंपादन होऊन ते सहा पदरी करण्याचेही नियोजन आहे. शिवाय नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी उड्डाणपूलही मंजूर आहेत. हे सगळं काम येत्या नाशिक कुंभमेळ्यापूर्वी होईल, अशी अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button