
नगर जिल्ह्यातले गेल्या महिनाभरातले राजकारण समजून घ्या. ज्यांना राजकारण कळतंय, त्यांना लगेच काहीतरी बदलल्याचं समजतंय. गेल्या महिन्या, दोन महिन्यांपासून महायुतीच्या राज्यातील सगळ्याच नेत्यांच्या नगरमध्ये दौऱ्यात लक्षणिय वाढ झालीय. विधानसभेला 12 पैकी 10 आमदार निवडून आलेला हा जिल्हा, आता महायुतीचा बालेकिल्ला झालाय. महायुतीचे जिल्ह्यातील विरोधकही गळाला लागताहेत. कधीकाळी काँम्रेड व त्यानंतर काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा जिल्हा आता भगवा झालाय, हे राजकीय विश्लेषकांना समजायला लागलंय. आज भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये पुन्हा उत्साह आणलाय. एवढंच कशाला, शहांनी पुढच्या दोन तपांचं राजकारण सेट करुन दिलंय. नेमकं काय चाललंय? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट
नगर जिल्हा हा खरंतर सहकाराचा जिल्हा. साखर कारखानदारी येथे उगवली व बहरली. इथलचं ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतचं राजकारण, हे फक्त सहकारावरच चालतं. अशा सहकाराच्या बालेकिल्ल्यात भगवा फुलवणं सोप्प नव्हतं. त्यात नगर जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा डीएनए असलेला. थोरात व विखे या दोन्ही दिग्गजांचं राजकारण काँग्रेसमधूनच सुरु झालं. पुढे विखे भाजपमध्ये आले. थोरात मात्र काँग्रेसमध्येच राहिले. या दोन्ही नेत्यांकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिले गेले. मुख्यमंत्री होण्याची धमक या दोन्ही नेत्यांत आहे. त्यातल्या त्यात राजकारणाचे बदलेले संदर्भ आभ्यासले तर, विखे मुख्यमंत्री होऊ शकतात ही शक्यता आता वाढली आहे.
जिल्ह्यात 2014 पासून भगव्या विचारसरणीची पायाभरणी झाली. त्यावेळी महायुतीने नगरच्या राजकारणात बऱ्यापैकी यश मिळवले. देशात नरेंद्र मोदींची लाट आल्यावर जिल्हातही भाजपच्या चर्चा होऊ लागल्या. 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा आलेख चढता राहिला. यावेळी तर 12 पैकी तब्बल 10 जागांवर महायुतीला विजय मिळाला. उरलेल्या दोन जागांवर महाविकास आघाडीने निसटता विजय मिळवला. स्वतः शरद पवारांचे नातू रोहित पवार, हे कर्जत-जामखेडच्या जागेवर काठावर निवडून आले. काँग्रेसला मिळालेली श्रीरामपूरची एकमेव जागाही लहू कानडे, भाऊसाहेब कांबळे व सागर बेग अशा दिग्गजांच्या मतविभागणीमुळे मिळाली. महायुतीचा व्हाईटवाँश थोडक्यात हुकला.
आता मात्र भाजपने त्यांचे आगामी स्टॅटर्जी पुन्हा बदलली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपच्या दिग्गजांच्या नगरमधील चकरा वाढू लागल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात नगरचा दौरा केला. त्यानंतर अजित पवारांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला. पारनेरमध्ये दसरा मेळावा घेतला. आता महिन्यांच्या सुरुवातीलाच भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहाता व कोपरगाव दौऱ्यावर होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी, महायुतीने अगदी तळापासून सुरुवात करताना दिसतेय. चाचपडणाऱ्या महाविकास आघाडीच्या वर्मावर घाव घालून तिला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी महायुतीने रणनिती आखल्याचे दिसतेय.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून नगरचे राजकारण वेगाने बदलतेय. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते महायुतीत आलेत. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, शरद पवार गटाचे पाथर्डीचे नेते प्रताप ढाकणे, शरद पवार गटाचेच राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे, ठाकरे गटाचे माजी मंत्री नेवाशाचे शंकरराव गडाख हे उरलेले नेतेही लवकरच महायुतीत येतील, अशा चर्चा सुरु झाल्यात. गलितगात्र झालेल्या मविआच्या या नेत्यांनाही भाजपमध्ये आणून नवसंजिवनी दिली जाते का, हाच काय तो प्रश्न आहे. अमित शहांचा नगर दौरा हा महायुतीसाठी बुस्टर डोस ठरला आहे. शिवाय, विखे हेच जिल्ह्याचे बाँस आहेत, यावरही शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. शिवाय सभापती राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे यांनाही विखेंशी जुळवून घेण्याचा कानमंत्र देणारा ठरला आहे.





