
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. ऑनलाइन अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप बियाणे मिळालेले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर खाजगी दुकानांतून महागड्या दराने बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे.
मंडळी, शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून सोयाबीन बियाणे योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कृषी विभागाने ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ दिले जाईल, असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज भरले.
मात्र आता प्रत्यक्ष लाभ देताना अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे. शासनाकडून बियाणे मिळेल या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांना आता खासगी विक्रेत्यांकडून जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत आहे. परिणामी खर्चात वाढ होतीये.
कोपरगाव तालुक्याचा विचार करता, ५ हजार ५७३ वैयक्तिक शेतकरी आणि १४५ शेतकरी गटांनी ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र त्यापैकी केवळ ११९ वैयक्तिक शेतकरी आणि ३० शेतकरी गटांचीच निवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
आता प्रश्न असा आहे की, वेळेत अर्ज करूनही शेतकरी वंचित का राहिले? आणि शासन यावर काय तोडगा काढणार? याकडे हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





