
यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये. मंडळी, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी यंदा पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलाय. एल निनोमुळे मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे.
तसेच पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या काळात पाऊस गायब होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की, पुरेसा पाऊस आणि जमिनीत योग्य ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
किमान ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. यंदा कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे फायदेशीर ठरू शकते. बाजरी, तूर, ज्वारी, नाचणी, मका, मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके कमी पाण्यात चांगली येऊ शकतात. विशेष म्हणजे ही पिके ६० ते ८० दिवसांत तयार होतात. त्यामुळे पावसाचा खंड पडला तरी नुकसान कमी होण्याची शक्यता असते.
तसेच कृषी विभागाने आंतरपिक पद्धतीचाही सल्ला दिला आहे. सोयाबीनसोबत तूर, कपाशीबरोबर मूग किंवा उडीद, तसेच बाजरीसोबत तूर अशी मिश्र पीक पद्धत फायदेशीर ठरू शकते. कारण एक पीक अडचणीत आले, तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळू शकते. मंडळी, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे.





