
अहिल्यानगरच्या विधानपरिषद निवडणुकीत आता रंगत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे युवा नेते आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातेय.
मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुकीसाठी करण ससाणे यांनी शुक्रवारी सर्वप्रथम अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारीही करण ससाणे यांनाच मिळण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेत मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवडून आलेले करण ससाणे यांच्याकडे तब्बल २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यभर मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा गड टिकवून ठेवण्यात करण ससाणे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या विजयामध्येही त्यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. मंडळी काँग्रेसची कामगिरी विधानपरिषदेवर कशी राहील? आपले मत कमेंटमध्ये व्यक्त करा.





