
श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवरून मोठी बातमी समोर आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारेगाव येथील २५ वर्षीय सभासद अर्जुन सुभाष पटारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सप्टेंबर महिन्यात अशोकनगर येथील कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी पटारे मुख्य प्रवेशद्वारावर गेले होते. यावेळी त्यांच्याकडे सभासद ओळखपत्राची मागणी करण्यात आली.
त्यांनी मोबाईलमध्ये ओळखपत्र दाखवल्यानंतर सिद्धार्थ मुरकुटे यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर घटनेचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करताना हातावर मारल्याने मोबाईल खाली पडून नुकसान झाल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.
यापूर्वी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आता या प्रकरणात तपासातून काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





