Latest

श्रीरामपूर शिंदे गटांत रंगलंय कोल्डवार; ‘तो’ नेता बैठक सोडून का गेला..?

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे या सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिंदे गटाच्या या फायरब्रॅण्ड नेत्या सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. आत्तापर्यंत शिर्डी, नेवासा या मतदारसंघात बैठका घेत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. गुरुवारी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी श्रीरामपूरमधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. याच बैठकीत शिंदे गटातील अंतर्गत कोल्ड वार समोर आलं. नगरपालिका निवडणुकीपासून शिवसेना शिंदे गटांत उडणारे खटके, आता थेट पक्षनिरिक्षकांसमोर उडाल्याने या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षाच्या संघटनात्मक रचनेत गेल्या महिन्यांत फेरबदल करण्यात आले. खासदार ज्योती वाघमारे यांची शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली. सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार आहेत. आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेची बांधणी लक्षात घेता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्या अनुषंगाने खा. ज्योती वाघमारे यांनी सध्या शिर्डी मतदारसंघात दौरे करुन सहा विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा सपाटा लावलाय.

या बैठकांमधून पक्षाची संघटनात्मक बळकटी, बूथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले जातेय. शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणे पदाधिकाऱ्यांची मते, सूचना व स्थानिक पातळीवरील अनुभव जाणून घेत पुढील वाटचालीचा ठोस आराखडा मांडला जात आहे.

श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत मात्र एक वेगळाच अनुभव आला. या बैठकीत पक्षांतर्गत समन्वय, अलिकडच्या निवडणुकांतील कामगिरी व उमेदवाराच्या निवडीवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीतला माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी खा. सदाशिक लोखंडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे असे सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते.

पक्षनिरिक्षक ज्योती वाघमारे यांच्यासमोर श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे सांगताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. स्थानिक परिस्थिती न पाहता नगराध्यक्षपदासाठी पक्षाने बाहेरुन आलेल्या उमेदवार तिकीट दिलं.

हे तिकीट बाहेरच्या महाराजांच्या सांगण्यावरुन दिलं गेलं. वास्तविक परिस्थिती वेगळी होती. केवळ एका महाराजांच्या सागण्यावरुन पक्ष तिकीट देत असेल तर जनता त्या उमेदवाराला कसं स्विकारेल? अशी अप्रत्यक्ष तक्रार त्यांनी पक्षनिरिक्षकांसमोर मांडली. आता यापुढे ज्या निवडणूका होतील त्यात तालुका कोअर कमिटी स्थापन करून तिच्या माध्यमातूनच उमेदवार निश्चित करावेत, आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार मुरकुटे यांनी मांडली.

आता मुरकुटे यांचा रोख कुणावर होता, हे सर्वांच्या लक्षात आले. शिवसेना शिंदे गटाने नगरपालिका निवडणुकीत भाजपमधून आलेल्या प्रकाश चित्ते यांना ऐनवेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संधी दिली. त्यांना शिंदे गटानं ज्यावेळी नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं, त्यावेळी तालुक्यातील दोन महाराजांचा त्यांच्या समर्थनार्थ व्हिडीओही चित्ते यांच्या समर्थकांनी व्हायरल केला होता.

महाराजांच्या सांगण्यावरुनच चित्ते यांना तिकीट दिलंय, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. वास्तविक पाहता, नगराध्यक्षपद खुलं झाल्यावर श्रीरामपूरमधील शिंदे गटातील अनेक नेत्यांना या पदाची अपेक्षा होती. ऑक्टोबर 2025 मध्ये प्रकाश चित्ते यांनी भाजपातून शिंदे गटांत प्रवेश केला होता. परंतु त्यांच्यापूर्वी माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे व हिंदूत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांनी शिंदे गटांत प्रवेश केला होता.

या तिघांच्या तुलनेने प्रकाश चित्ते हे उशीरा शिवसेनेत दाखल झाले होते. परंतु तरीही त्यांना पक्षाने तिकीट दिले, हे शिवसेनेच्या पूर्वीच्या कट्टर कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यासारखेच होते. हीच बाब, माजी आ. मुरकुटे यांनी पक्ष निरिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. आ. मुरकुटे यांचे भाषण सुरु असताना प्रकाश चित्ते यांनी या बैठकीतून काढता पाय घेतल्याच्याही चर्चा रंगल्या. शिवसेना शिंदे गटांतील कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये शितयुद्ध सुरु असल्याचं दिसलं.

याच बैठकीत नूतन नगरसेवक आकाश बेग यांनीही गेल्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी सागर बेग हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. ते अपक्ष असले तरी हिंदूत्ववादी कार्यकर्ते म्हणून त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते, असं सागर बेग यांचं म्हणणं होतं. माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी सागर बेग यांना पाठबळ दिलं परंतु माजी आ. भाऊसाहेब कांबळे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी त्यांना समर्थन दिलं असतं तर आज शिवसेनेचा खासदार असता, अशी खंत आकाश बेग यांनी व्यक्त केली.

पक्ष निरीक्षक खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून घेत, संघटना अधिक बळकट करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या येथील पदाधिकार्‍यांना सूचना केल्या. भाजपमध्ये संधी मिळत नसल्याची तक्रार करत प्रकाश चित्ते यांनी शिवसेना शिंदे गटांत प्रवेश केला. परंतु आता शिवसेना शिंदे गटांतील स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या नेतृत्त्वावर शंका उपस्थित केल्याने भविष्यात चित्ते हे पुन्हा पक्ष बदलतील का? हा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button