
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सदर शासकीय जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. त्यामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीसाठीचा मार्ग सुकर झाला असून, पठारभागातील हजारो युवकांच्या रोजगाराच्या अपेक्षांना नव्याने बळ मिळाले आहे.
कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. यामध्ये सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. मात्र, ही जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. औद्योगिक वसाहतीसाठी क्षेत्र प्रस्तावित असताना ही जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता.
कौठे मलकापूर ग्रामसभेनेही सौरऊर्जा प्रकल्पास नामंजुरी दर्शविली होती. तसेच सदर शासकीय जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी प्रस्तावित असल्याने ती सौरऊर्जा प्रकल्पासाठी देणे योग्य ठरणार नसल्याचे तहसीलदारांनीही स्पष्ट केले होते. स्थानिक ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध करत आंदोलनही केले होते.
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले होते. कौठे मलकापूर येथील सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी न देता औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याच्या कार्यवाहीला स्थगिती मिळाली असून, पुढील कार्यवाही औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत विकसित झाल्यास परिसरात नवीन उद्योग व गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच पठार भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
संगमनेरच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य देत स्थानिकांच्या हिताचा निर्णय व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सौरऊर्जा प्रकल्पा ऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन उपलब्ध होणे ही संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त करतो.





