
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच खरीप पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन भंडारदरा धरणातून सोमवार, १४ सप्टेंबरपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
मंडळी, यंदा तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांतील खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही अडचण जाणवू लागली होती. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती.
यासोबतच गणेश विसर्जनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणी गणेश मंडळांकडूनही करण्यात आली होती. आमदार अमोल खताळ यांनी लोणी येथील बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हा मुद्दा मांडला.
त्यानंतर टंचाई आढावा बैठकीतही त्यांनी मागणीचा पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.





