
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आता पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील निघोज येथील सराईत विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत ‘मोक्का’ लावला आहे.
मंडळी, २४ फेब्रुवारीला करंदी येथे दांपत्याच्या घरावर दरोडा टाकून मारहाण करण्यात आली होती. यावेळी सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्यात आली. तपासात या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली.
चौकशीत टोळीने पारनेर परिसरातील इतर गुन्ह्यांचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि दुखापतीसह तब्बल १२ गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत.
विशाल काळे, पंकज काळे, प्रविण काळे आणि गिरीश काळे यांच्यावर कारवाई झाली असून सचिन काळे फरार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मोक्का न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.





