
अहिल्यानगरच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या निवडणुकांपैकी एक मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्यात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवण्यापासून वंचित राहणार असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
मंडळी, जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसते. या निवडणुकीचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत असतो. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय गटांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार कोणाला असेल, याबाबतही काही महत्त्वाच्या अटी आहेत.
१ जून २०२३ किंवा त्यापूर्वी बँकेचे सभासद असलेल्या संस्थाच मतदानासाठी पात्र राहणार आहेत. काही थकबाकीदार संस्थांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा एका नव्या नियमाची आहे.
सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना आता पुन्हा संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते या निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. यामुळे आता त्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या गटातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे यंदाची जिल्हा बँक निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.





