
सिस्पेमध्ये तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे पैसे अडकले आहेत? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अहिल्यानगरातील बहुचर्चित सिस्पे इन्फिनिटी घोटाळ्यातील गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य आरोपींच्या फ्रीज केलेल्या बँक खात्यांतील ११५ कोटी रुपये परत करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या प्रक्रियेसाठी श्रीगोंदा–पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर पात्र गुंतवणूकदारांना ही रक्कम परत केली जाणार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अगस्त राहुल मिश्रा अद्याप फरार असून, चार संचालकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे ४०० गुंतवणूकदारांनी जबाब नोंदवले असून, कागदोपत्री २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीची नोंद झाली आहे.
मात्र आरोपी आणि एजंटांच्या खात्यांमधून ११५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी उर्वरित गुंतवणूकदारांनाही पुढे येऊन जबाब नोंदवण्याचे आवाहन केले आहे.





