
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीची परीक्षा फी पूर्णपणे परत केली जाणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं, तर यंदा दहावी आणि बारावी मिळून सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
मात्र, ही सवलत शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार केवळ प्रत्यक्ष पूर किंवा अतिवृष्टीमुळे बाधित विद्यार्थ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही. संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयानेच मंडळाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. ही प्रक्रिया २० एप्रिल २०२६ ते २ मे २०२६ या कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक, आधार नंबर आणि बँक खाते क्रमांक अचूक भरणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हीच माहिती वापरून थेट खात्यात पैसे जमा होणार आहेत. मंडळी, हा निर्णय हजारो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे. त्यामुळे ही माहिती प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचवा.





