Latest

भुईकोटचा विकास होणार ! जिल्हा प्रशासन व भारतीय लष्करात करार; ‘इतके’ कोटी मंजूर

अहिल्यानगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कर यांच्यात सामंजस्य करार होणार असून किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात असल्याने येथे कोणतीही विकासकामे करण्यासाठी लष्कराची परवानगी आवश्यक असते. याच कारणामुळे गेल्या वर्षभरापासून विकासकामे रखडली होती.

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन २.० योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून एकमेव भुईकोट किल्ल्याची निवड करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कर यांच्यातील कराराची प्रतीक्षा होती.

या विकास आराखड्यात किल्ल्याच्या परिसरातील झाडीझुडपे काढणे, खंदकातील गाळ काढणे, भिंती आणि बुरुजांची डागडुजी, माहिती केंद्र उभारणे, सौर पथदिवे, स्वच्छतागृहे, वाहनतळ आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. किल्ला परिसरात कायमस्वरूपी नवीन बांधकामांना परवानगी नसणार आहे.

एकंदरीतच, अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button