
महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे! गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. यामध्ये सर्वाधिक १४ हजार ६९३ कंपन्या व्यवसाय सेवा क्षेत्रातील आहेत. व्यापार क्षेत्रातील ४ हजार १९६, बांधकाम क्षेत्रातील २ हजार ३५६, तर शेतीशी संबंधित १ हजार १७८ कंपन्यांचा समावेश आहे.
शहरांचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वाधिक कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यानंतर पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, रायगड आणि संभाजी नगरचा क्रमांक लागतो.
मात्र सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे. या ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्यामुळे नेमक्या किती रोजगारांवर परिणाम झाला, याची आकडेवारी मंत्रालयाने दिलेली नाही.
कंपन्या बंद होणे म्हणजे केवळ व्यवसाय थांबणे नाही; त्यामागे गुंतवणूक, रोजगार आणि अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा प्रश्नही जोडलेला आहे.





