
तर मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात पाणीटंचाईचे हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे. आनंदवाडी येथे बबन बन्सी गीते या ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी आंघोळीसाठी ते विहिरीवर गेले होते. विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी उपसत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले; मात्र खडकावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. पण त्यांचे नातेवाईक ऊस तोडणीसाठी बाहेर गेले असल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
उपचाराअभावी सुमारे तीन तासांनी त्यांचा घरीच मृत्यू झाला. यंदा कमी पावसामुळे जामखेड तालुक्यात पाणी संकट गंभीर बनले आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला असून, सप्टेंबरमध्ये ५ गावे आणि ७ वाड्यावस्त्यांना ७ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
आनंदवाडीसाठीही टँकरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे.





