
एका क्षुल्लक वादाचा शेवट इतका भयंकर होईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथे धक्कादायक घटना घडली. सौंदळा येथील ५९ वर्षीय संभाजी आसाराम साळुंके यांचा ट्रॅक्टर अंगावर घालून खून केल्याचा आरोप त्यांच्याच नात्यातील २५ वर्षीय विशाल नंदू आरगडे याच्यावर आहे.
विशाल हा मयत संभाजी आसाराम साळुंखे यांच्या पुतणीचा मुलगा म्हणजे नातू. तो शनिवारी संध्याकाळी ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात गाणी लावत होता. त्या आवाजामुळे संभाजी साळुंके यांच्या शेळ्या दचकून पळाल्या. त्यामुळे त्यांनी विशालला आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी विशालने धमकी दिल्याचे सांगितले जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजी साळुंके पेट्रोल भरण्यासाठी भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखाना पेट्रोलपंपावर गेले. तिथे विशालने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी संभाजी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर विशाल ट्रॅक्टरसह फरार झाला असून, नेवासा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.





