
अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी एक .महत्वाची अपडेट आली आहे. शेतीसाठी धरणांमधून सुरू असलेली किंवा प्रस्तावित पाणी आवर्तने तातडीने बंद करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिलेत.
मंडळी, यावर्षी एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलीये. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार, धरणांमधून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी तात्काळ थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.
म्हणजेच अनेक भागांतील शेतकऱ्यांना आता सिंचनाच्या पाण्याबाबत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ३१ ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अखंडित राहिला पाहिजे. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तो प्रामुख्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिलेत.
याशिवाय, बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठीही कडक पावले उचलण्यात येत आहेत. महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी आणि गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मंडळी, सध्या हा निर्णय पिण्याच्या पाण्याची भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी घेतला असला, तरी दुसरीकडे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.





