
कोपरगावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६च्या गळीत हंगामासाठी ऊस दराची घोषणा केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या ७३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना अनुदानासह प्रतिटन ३३०० रुपये दर दिला जाणार आहे. तर ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या उसाला अतिरिक्त १०० रुपये अनुदान, म्हणजेच ३४०० रुपये प्रतिटन दर मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून ३००० रुपये देण्यात आले असून, जूनमध्ये प्रतिटन १०० रुपयेही देण्यात आले होते. आता आणखी १५० रुपये आणि ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची माहिती देण्यात आली.
कारखान्याला २०२५-२६मध्ये ३.८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, आर्थिक कारभाराला ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग मिळाल्याचंही सांगण्यात आलं.
मात्र, वाढता ऊस दर टिकवण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९ ते १० लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन आवश्यक असल्याचं आशुतोष काळे यांनी स्पष्ट केलं.





