
अहिल्यानगरमध्ये एक मोठी कारवाई समोर आली आहे. शहरात गुपचूप सुरू असलेल्या बेकायदेशीर सुगंधी तंबाखू कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत मोठा पर्दाफाश केला आहे. मंडळी, अहिल्यानगर शहरात गजराजनगर परिसरात एका घरातच सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
राज्यात विक्रीस बंदी असलेल्या आणि आरोग्यास अत्यंत घातक अशा पदार्थांचा वापर करून ही तंबाखू तयार केली जात होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अन्न सुरक्षा विभागासोबत संयुक्त छापा टाकला.
या कारवाईत असिफ तांबोळी, जाफर शेख आणि दाऊद शेख या तिघांना अटक करण्यात आली. या ठिकाणी साध्या तंबाखूमध्ये विविध रसायने, रंग आणि इतर घातक पदार्थ मिसळून बनावट सुगंधी तंबाखू तयार केली जात होती.
छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे. यात ६०० किलो सुगंधी तंबाखू, तीन मिक्सर मशीन, पिशव्या सील करण्यासाठी मशीन, कलर, चुना, पॅराफिन रसायन, एअर कंप्रेसर, वजनकाटा, बनावट किवाम, स्टिकर्स आणि टाटा सफारी वाहन असा एकूण सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.





