Latest

घातपात नव्हे, तो अपघातच ! डॉ. जितेंद्र शेळके यांची बदनामी थांबवा , शिर्डीकरांची मागणी

शिर्डीत डॉ. जितेंद्र शेळके यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या चर्चांमुळे वातावरण तापले असून, त्यांच्या बदनामीला आळा घालण्याची मागणी करत ग्रामस्थ एकत्र आले आहेत. डॉ. शेळके हे उच्चशिक्षित आणि यशस्वी उद्योजक होते. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या अपघाती निधनाने शिर्डीत शोककळा पसरली असताना, काहीजण या घटनेला वेगळे वळण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शेळके यांनी केवळ धार्मिक भावनेतून ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, मात्र 2023 मध्येच त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. जर त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा असता, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती. प्रत्यक्षात त्यांच्या नावावर साधा गुन्हाही नोंदलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. शेळके यांचा जीवनप्रवासही प्रेरणादायी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अमेरिकेचे ग्रीन कार्ड सोडून त्यांनी आई-वडिलांच्या इच्छेखातर शिर्डीत परत येत समाजसेवेला स्वतःला वाहून घेतले होते. परदेशातील साईभक्तांना शिर्डीशी जोडण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. तसेच शिर्डी परिक्रमा उत्सवाच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ते कायम पुढाकार घेत असत.सध्याच्या परिस्थितीत अपूर्ण माहितीच्या आधारे सुरू असलेल्या चर्चा थांबवाव्यात आणि त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा, असे आवाहन शिर्डीकरांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button