Latest

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा बळी ! मका कापताना महिलेचा मृत्यू

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एक दुर्दैवी घटना घडली असून, शेतात काम करत असताना एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हर्षदा रावसाहेब चौधरी (वय ४६) असे मृत महिलेचे नाव आहे, त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चौधरी कुटुंबाचा मोठा दुग्ध व्यवसाय असल्याने हर्षदा या नेहमीप्रमाणे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी दुपारच्या सुमारास शेतात गेल्या होत्या. दुपारी सुमारे एक वाजता कडक उन्हात मका कापत असताना त्यांना अचानक उष्णतेचा तीव्र त्रास जाणवू लागला.

काही वेळातच त्यांना चक्कर येऊन त्या शेतातच बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या.त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरकडे हलविण्यात येत होते. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने वाटेतच त्यांना जखणगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू असून नातेवाईकांचे जबाब नोंदविण्याचे कामही करण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा आणि आवश्यक असल्यास योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button