Latest

एकाच गोडाऊनला सलग तिसऱ्या वर्षी आग! नेमकं काय घडतंय? आगीमागचं रहस्य अद्याप उलगडेना!

अहिल्यानगरमध्ये एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला पुन्हा आग लागली… विशेष म्हणजे ही पहिली किंवा दुसरी वेळ नाही, तर सलग तिसऱ्या वर्षी याच गोडाऊनमध्ये आगीची घटना घडली आहे! त्यामुळे या आगीच्या घटनांमागे नेमकं कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

स्टेशन रोडवरील भुतारे मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट आणि धुराचे ढग तब्बल एक किलोमीटरपर्यंत दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आगीची धग कायम असल्याने एमआयडीसी आणि व्हीआरडीईच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी दिवाळीत याच गोडाऊनला मोठी आग लागली होती. मागील वर्षीही आग लागली आणि आता पुन्हा तिसऱ्या वर्षी तीच घटना!

तीन वर्षे, तीन आगी… तरीही आग प्रतिबंधक उपाययोजनांचा प्रश्न कायम! आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा केवळ योगायोग की इतर काही गंभीर प्रकार ? या प्रश्नाचे उत्तर आता तपासातूनच समोर येणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button