Latest

अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात ! दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जामखेड तालुक्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मंडळी, हा भीषण अपघात जामखेड-माहिजळगाव-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीवरील पाटोदा, गरडाचे परिसरात रविवारी पहाटे घडला. आयसर ट्रक आणि हुंडाई वेन्यू कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग, करमाळा येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाटोदा ते रत्नापूर दरम्यान महामार्गावर मोठ्या भेगा पडल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करून केवळ एकाच लेनवरून वाहने सोडली जात होती. अशाच वेळी समोरून येणाऱ्या आयसरने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

या अपघातानंतर अपूर्ण महामार्ग, सुरू असलेली दुरुस्ती आणि एकेरी वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button