
डी-मार्टमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! आता किराणा आणि घरगुती वस्तूंसोबत औषधेही एकाच ठिकाणी मिळणार आहेत. डी-मार्टने औषधांच्या किरकोळ विक्री क्षेत्रात प्रवेश करत मुंबईतील काही निवडक स्टोअर्समध्ये प्रायोगिक स्वरूपात फार्मसी काऊंटर सुरू केले आहेत.
विशेष म्हणजे, ग्राहकांना अनेक औषधांवर सरसकट 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा नवा निर्णय घेतला आहे.
झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे किरकोळ बाजारात स्पर्धा वाढत असताना डी-मार्ट आपल्या सेवांचा विस्तार करत आहे.
स्वतंत्र मेडिकल सुरू करण्याऐवजी विद्यमान स्टोअर्समध्येच फार्मसी काऊंटर सुरू करण्याची रणनीती कंपनीने स्वीकारली आहे.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात इतर शहरांतील डी-मार्ट स्टोअर्समध्येही ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आवश्यक किराणा आणि औषधे एकाच ठिकाणी, अधिक सवलतीत खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो.





