
विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी इतिहासात प्रथमच सुवर्ण पादुका अर्पण करण्यात आल्या आहेत आणि या सुवर्ण पादुका अर्पण केल्यात अहिल्यानगरमधील एका अनामिक भक्ताने.
मंडळी, या सुवर्ण पादुकांचे वजन जवळपास अर्धा किलो असून त्यांची अंदाजे किंमत तब्बल ५६ लाख रुपये आहे. आतापर्यंत श्री विठ्ठलाच्या चरणी चांदीच्या पादुका होत्या. मात्र, सुवर्ण पादुका अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिराच्या सोने-चांदी विभागाचे प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी दिली आहे.
या पादुकांची निर्मिती रांका ज्वेलर्सने केली असून अवघ्या आठ दिवसांत चार कुशल कारागिरांनी या पादुका तयार केल्या आहेत. त्यावरील आकर्षक हस्तनक्षीही अत्यंत बारकाईने करण्यात आली आहे.
या सुवर्ण पादुकांचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाच्या चरणांचे प्रत्यक्ष मोजमाप न घेता या पादुका तयार करण्यात आल्या आहेत. कारागिरांच्या कौशल्यामुळे त्या विठुरायाच्या चरणांसाठी साकारण्यात आल्या.
मंडळी, अहिल्यानगरच्या या अनामिक भक्ताच्या भक्तीची आज राज्यभर चर्चा होत आहे. श्रद्धा, सेवा आणि समर्पण याचं हे एक सुंदर उदाहरण मानलं जात आहे.





