
जमीनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी.. आता कौटुंबिक जमिनीची वाटणी करताना मोजणीसाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. राज्य सरकारने जमीन मोजणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून, कौटुंबिक वाटणीची जमीन आता अवघ्या २०० रुपयांत मोजून मिळणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा कुटुंबातील परस्पर संमतीने झालेल्या वाटणीच्या मोजणीसाठी आता प्रति पोटहिस्सा केवळ २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासोबतच नियमित जमीन मोजणी ९० दिवसांत, तर द्रुतगती मोजणी ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेय.
नव्या दरांनुसार ग्रामीण भागात दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी दोन हजार रुपये, तर द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शहरी भागात एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी तीन हजार रुपये आणि द्रुतगती मोजणीसाठी बारा हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम केला आहे. मोजणीच्या दिवशी अर्जदार गैरहजर राहिल्यास मूळ शुल्काच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. मात्र, भूमापक किंवा संबंधित अधिकारीच गैरहजर राहिले, तर अर्जदारावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. मंडळी, हे बदल तुम्हाला कसे वाटले? कमेंटमध्ये नक्की सांगा..





