
शनिशिंगणापूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे का? शनिमूर्तीवर अर्पण होणाऱ्या तेलाबाबत गंभीर आरोप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी आणि भाविकांनी या प्रकरणाची तक्रार थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मार्च २०२५ मध्ये शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनिमूर्तीवर फक्त ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय प्रभावीपणे राबवला गेला नसल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने संशयित कंपन्यांच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.
मात्र त्या तपासाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले की, मंदिरातील बहुतांश तेल बाहेरील दुकानांतून येते. त्यामुळे त्या तेलाची तपासणी करण्यासाठी FDA ला अधिकृत पत्र देण्यात येणार आहे.
याशिवाय, तेल आणि पूजासाहित्याच्या नावाखाली भाविकांकडून जादा पैसे घेत असल्याचाही आरोप होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे





