
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी भल्या पहाटे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील अवैध गावठी हातभट्टी दारुविक्रीवर धाड टाकली. या धाडीत तब्बल पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी देवळाली प्रवरा येथील गणेश रमेश गायकवाड, रवींद्र दिगंबर डुकरे, राजेंद्र धोंडीराम उंडे, बापू भास्कर गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात, राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी या पतसंस्थेचा चेअरमन रामचंद्र विठ्ठल काळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस काँन्स्टेबल भगवान थोरात यांनी या प्रकरणात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, हातभट्टी तयार करणाऱ्या चारही आरोपींनी, रामचंद्र काळे याच्या हर्षल किराणा स्टोअर्स या दुकानातून गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला माल आणला होता.
गावठी हातभट्टी दारुने एखाद्याचा जीवही जावू शकतो, हे माहित असतानाही काळे याने आपल्या दुकानात दारु तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते.
पोलिसांनी या छाप्यात, तब्बल 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने गावठी हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत असले तरी, कारवाईत सातत्य रहावे, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.





