
“मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा थेट चीनच्या नामांकित संस्थेतून पीएच.डी. मिळवतो… आणि संपूर्ण शेवगावचा अभिमान बनतो !” मंडळी, शेवगाव तालुक्यातील हातगावचे सुपुत्र डॉ. नागेश शिवनाथ मानूरकर यांनी चीनमधील प्रसिद्ध Beijing Institute of Technology मधून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी मिळवली आहे.
विशेष म्हणजे त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातून झाले. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर संकट आले. पण आईच्या अथक संघर्षाने आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर नागेश यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.
न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेल्या नागेश यांनी ‘अमिनो अॅसिड आधारित शिफ बेस लिगँड्स’ या क्लिष्ट विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचे तब्बल १५ आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशन झाले आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. नक्कीचं हातगाव ते चीन… हा प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





