
राशीनमध्ये बेकायदेशीर प्लॉट विक्री प्रकरणात प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. कर्जत तालुक्यातील राशीन येथे बिगरशेती प्लॉटमधील अमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेस विकासकांनी नियमांचे उल्लंघन करून विकल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी महत्त्वाचा आदेश देत ही विक्री पूर्णपणे बेकायदेशीर ठरवली आहे.
या जागा आता राशीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
ही तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते योगेंद्र सांगळे यांनी १७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी सखोल चौकशी केली. जवळपास ९ महिने विकासक आणि खरेदीदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गाव दप्तरी पुरावे तपासण्यात आले.
चौकशीत ओपन स्पेसची विक्री नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. योगेंद्र सांगळे यांच्या माहितीनुसार, राशीनमधील इतर बिनशेती आदेशांवरही पुढील काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.





