
अहिल्यानगरमध्ये सध्या पेट्रोल-डिझेलसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा तर काही ठिकाणी थेट ड्रम घेऊन नागरिक पेट्रोल पंपांवर पोहोचल्याचे दिसत आहे.
आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त आहेत, त्यात आता इंधन मिळणार नाही, अशी चर्चा सुरू झाल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साठा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षात पुरवठा सुरू असतानाही काही वेळासाठी कृत्रिम टंचाई निर्माण झाली.
अनेक पेट्रोल पंपांवर ‘डिझेल उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकांना तासन्तास रांगेत थांबून मर्यादित इंधन घ्यावे लागले. दरम्यान, कोपरगावमध्ये परिस्थिती आणखी गंभीर दिसून आली. शहरातील एका पंपावरच डिझेल उपलब्ध असल्याने तेथे मोठी गर्दी झाली.
शेतकरी आणि वाहनधारक ड्रम घेऊन पोहोचले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तात डिझेलचे वितरण करण्यात आले. काही तासांतच त्या पंपावरील डिझेलचा साठाही संपल्याचे सांगितले जात आहे.
मात्र पेट्रोल काही ठिकाणी उपलब्ध असल्याने त्यासाठीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, ज्या ठिकाणी तुटवडा आहे तेथे तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.





