
दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेला अशोक खरात आता पुन्हा चर्चेत आहे. कारण आता त्याला तब्बल ३ कोटी रुपये मिळणार आहेत. महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे सध्या तुरुंगात असलेला नाशिकचा भोंदू खरात आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोडचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन सुरू असून, त्यामध्ये अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनींचाही समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या जमिनींच्या बदल्यात खरात कुटुंबाला सुमारे ३ कोटी रुपयांचा मोबदला मिळू शकतो. गवळाणेच्या जमिनीसाठी खरात आणि त्याच्या पत्नीला जवळपास ८३ लाख रुपये तर पाथर्डी शिवारातील जमिनींसाठी मुलगी तृप्तबाला आणि सृष्टी यांना तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र हा मोबदला मिळवण्यासाठी संबंधित जमीन कायदेशीररित्या स्वतःची असल्याचे पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे शासनाकडे सादर करावी लागणार आहेत. तसेच खरात प्रकरणात निलंबित झालेले उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचं नावही या भूसंपादन प्रक्रियेत समोर आलं आहे. म्हणून सध्या या संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.





