
आता पोलिसांना सकाळी १० वाजता हजर राहावंच लागणार!” अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात शिस्त लावण्यासाठी नवा कडक आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व पोलिस ठाणे आणि कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची सकाळी १० वाजण्यापूर्वी हजेरी घेण्याचे आदेश दिले आहेत.
आता उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अहवाल पाठवला जाणार असून कारवाई होण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुदर्शन यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाची अचानक पाहणी केली. त्यावेळी अनेक कर्मचारी वेळेत हजर नसल्याचे आढळून आले.
फक्त कार्यालयातच नाही, तर अनेक पोलिस ठाण्यांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. आधीच अपुरे मनुष्यबळ असताना कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पोलिस दलात शिस्त आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
पोलिस मुख्यालयात थम्ब मशीनची सुविधा असली तरी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये अजूनही रजिस्टरवर हजेरी घेतली जाते. त्यामुळे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळेवर नोंद दाखवली जात असल्याचा आरोप आहे.
बंदोबस्ताच्या ठिकाणीही काही कर्मचारी वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, अहवाल पाठवूनही कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.





