मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणुकांचा हंगाम संपला असं म्हटलं जातं. लोकसभा, मग विधानसभा, त्यानंतर नगरपालिका व नगरपरिषा, त्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिका, त्यानंतर राहुरी पोटनिवडणूक, त्यानंतर विधान परिषद आणि नुकतीच झालेली अहिल्यानगर जिल्हा बँक… या सगळ्या निवडणुका आता झाल्या. आता कदाचीत पुढच्या वर्षी थेट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बार उडेल. पण निवडणूक कोणतीही असो, आपल्या कानावर एक वाक्य नेहमी पडतं— “तुमचं एक मत खूप महत्त्वाचं आहे, एका मताने चित्र बदलू शकतं.” पण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे फक्त एक घोषवाक्य आहे. लाखो मतदार असलेल्या मतदारसंघात माझ्या एका मताने काय फरक पडणार?
पण थांबा, आज आपण नगर जिल्ह्यातील अशा निवडणुकांचा मागोवा घेणार आहोत, जिथं खरंच एक-एक मतही गेम फिरवून गेलंय… राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात १९५१ पासून ते २०२४ पर्यंत अनेक ऐतिहासिक निवडणुका झाल्या, ज्या निवडणुकांत अगदी काही मतांवर आमदार ठरलेत… या ७३ वर्षांच्या प्रवासात काही नेते थेट लाखांच्या मताधिक्याने निवडून आले, तर काही नेते असेही होते ज्यांचा श्वास मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत अडकला होता.
आकडेवारी सांगते की, १९५१ पासून आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १३ वेळा असे प्रसंग आले, जेव्हा आमदारांचा विजय अवघ्या एक हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने झाला. पण आजच्या या विशेष भागात आपण या यादीतील अशा दोन सर्वात थरारक निवडणुकांचं सखोल विश्लेषण करणार आहोत, जिथे विजयाचं अंतर शेकड्यांतही नव्हतं, तर चक्क बोटावर मोजण्याइतकं—म्हणजेच अवघ्या १२ आणि २४ मतांचं होतं!
कोण होते हे दोन उमेदवार? कोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या राजकीय परिस्थितीत हा थरार घडला? आणि या अत्यंत निसटत्या विजयामागे नेमकी कोणती राजकीय समीकरणं होती? चला, सविस्तर समजून घेऊया…
१९५१-५२ मध्ये जेव्हा देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. तेव्हापासूनच नगर जिल्ह्याचं राजकारण हे अत्यंत संवेदनशील आणि चुरशीचं राहिलं. इथे कधी काँग्रेसचा एकहाती दबदबा राहिला, तर कधी शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, जनता पक्ष आणि नंतरच्या काळात शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवली. पण जेव्हा एकाच मतदारसंघात दोन तुल्यबळ नेते समोरासमोर येतात, किंवा तिसऱ्या एखाद्या अपक्ष उमेदवाराने मतांचं विभाजन केलं जातं, तेव्हा विजयाचं गणित पार कोलमडून जातं.
१९५१ पासून २०२४ पर्यंतच्या सर्व निवडणुकांचा लेखाजोखा मांडला, तर सर्वात कमी मतांनी विजयी होण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे १९९५ ची शेवगाव विधानसभा निवडणूक तेथे फरक होता फक्त १२ मतांचा. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे १९७८ ची कर्जत विधानसभा निवडणूक जिथं फरक होता फक्त २४ मतांचा…
आपण क्रमवारपणे या दोन्ही निवडणुकांची माहिती घेऊयात.
सुरुवात करूया क्रमांक दोनपासून, म्हणजेच १९७८ च्या कर्जत विधानसभा निवडणुकीपासून.
वर्ष होतं १९७८. देशात आणीबाणीनंतरचं वातावरण होतं. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या विरोधात जनमत तयार झालं होतं आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ‘जनता पक्षा’च्या झेंड्याखाली निवडणूक लढवत होते. त्याच वर्षी मतदारसंघांची पुनर्रचनाही झाली होती. अशा वादळी वातावरणात आरक्षित असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात एक अत्यंत ऐतिहासिक लढत रंगली. या निवडणुकीत मुख्य सामना होता तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार बाजीराव दशरथ कांबळे आणि जनता पक्षाचे उमेदवार बाबुराव महादेव भारस्कर यांच्यात.
त्या काळी कर्जत मतदारसंघात एकूण नोंदणीकृत मतदार होते ९८ हजार ७६०. त्यापैकी ५८ हजार २८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच सुमारे ५९ टक्के मतदान झालं. जेव्हा मतमोजणी सुरू झाली, तेव्हा सुरुवातीपासूनच बाजीराव कांबळे आणि बाबुराव भारस्कर यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. एका फेरीत कांबळे पुढे, तर दुसऱ्या फेरीत भारस्कर आघाडीवर! शेवटची मतपेटी उघडेपर्यंत कोणाचा विजय होणार, याचा अंदाज बांधणं भल्याभल्या राजकीय विश्लेषकांनाही कठीण झालं होतं. आणि जेव्हा अंतिम निकाल जाहीर झाला, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे डोळे विस्फारले!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाजीराव कांबळे यांना मिळालेली मते होती: २३,१५७
तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी जनता पक्षाचे बाबुराव भारस्कर यांना मिळालेली मते होती: २३,१३३
मित्रांनो, इथे आपण एक गोष्ट बारकाईने समजून घेतली पाहिजे की ही २४ मतांची लढत इतकी अटीतटीची का झाली? त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे उमेदवार विजय प्रभाकर शिंदे यांना केवळ ४,०८९ मते मिळाली होती. काँग्रेसची पारंपरिक मते विभागली गेली होती. शिवाय या निवडणुकीत चार अपक्ष उमेदवार रिंगणात होते. विशेषतः गणपत गोविंद शिंदे (१,८५६ मते), बाळकृष्ण रामचंद्र रोकडे (१,७५२ मते) आणि एकनाथ बापूजी शिंदे (१,४६८ मते) यांनी मिळून ५ हजारांहून अधिक मते घेतली होती.
तसेच १९७८ मध्ये बॅलेट पेपरवर मतदान होत असे. त्या निवडणुकीत तब्बल २,३७२ मते अवैध किंवा बाद ठरली होती. जिथे विजयाचा फरक फक्त २४ मतांचा असतो, तिथे अडीच हजार मते बाद होणं हे पराभूत उमेदवारासाठी किती वेदनादायी असेल, याची आपण कल्पना करू शकतो! अशा प्रकारे २४ मतांच्या निसटत्या आघाडीवर बाजीराव कांबळे विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी जिल्ह्याच्या निवडणूक इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कमी मताधिक्याच्या विजयाची नोंद केली.
पण मित्रांनो, हा विक्रम पुढे १७ वर्षे अबाधित राहिला. आणि १७ वर्षांनंतर, १९९५ मध्ये असा एक चमत्कार घडला, ज्याने २४ मतांचाही विक्रम मोडीत काढला…
आता आपण वळूया नगर जिल्ह्याच्या निवडणूक इतिहासातील क्रमांक एकच्या म्हणजेच सर्वात कमी मतांच्या फरकाने झालेल्या निवडणुकीकडे. वर्ष होतं १९९५. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर घडत होतं. राज्यात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेसी, म्हणजेच शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर येण्याच्या उंबरठ्यावर होतं. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अशा राजकीय वातावरण तापलेलं असताना, नगर जिल्ह्यातील शेवगाव विधानसभा मतदारसंघात एक हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळाली.
या निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात होते ज्येष्ठ नेते पांडुरंग गमाजी अभंग, तर त्यांच्यासमोर होते अपक्ष उमेदवार तुकाराम गंगाधर गडाख. तुकाराम गडाख हे त्यापूर्वी १९९० च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ते विद्यमान आमदार होते, तर पांडुरंग अभंग यांना सहकार आणि स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव नसला तरी ते सहकारमहर्षी असलेल्या घुले पाटलांचे उमेदवार होते.
शेवगाव-पाथर्डी परिसरातील या दोन दिग्गजांमध्ये ही अस्तित्वाची लढाई होती. १९९५ च्या या निवडणुकीत शेवगाव मतदारसंघात एकूण १ लाख ७२ हजार २८१ मतदार होते. त्यापैकी तब्बल १ लाख ३० हजार ७५८ मतदारांनी मतदान केलं, म्हणजेच मतदानाची टक्केवारी जवळपास ७६ टक्के इतकी प्रचंड होती.
जेव्हा मतमोजणी सुरू झाली, तेव्हा शेवगावच्या तहसील कार्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. प्रत्येक फेरीगणिक धाकधूक वाढत होती. पांडुरंग अभंग आणि तुकाराम गडाख यांच्यात अक्षरशः काट्याची टक्कर सुरू होती. मतमोजणीच्या टेबलावर एक-एक मत मोजलं जात होतं. आणि शेवटी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम आकडेवारी जाहीर केली, तेव्हा कोणाचाच स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना!
काँग्रेसचे पांडुरंग गमाजी अभंग यांना मिळालेली मते होती: ५१,२९७.
तर अपक्ष उमेदवार तुकाराम गंगाधर गडाख यांना मिळालेली मते होती: ५१,२८५.
दोघांच्याही मतांची टक्केवारी होती समान— ४०.२१ टक्के!
आणि विजयाचा फरक होता— फक्त आणि फक्त १२ मते
मित्रांनो, जरा विचार करा. सव्वा लाखांहून अधिक मतदान झालेल्या एका मतदारसंघात एका उमेदवाराला ५१ हजार २९७ मते पडतात आणि दुसऱ्या उमेदवाराला ५१ हजार २८५ मते पडतात. केवळ १२ मतांच्या फरकाने एका नेत्याच्या गळ्यात आमदारकीची माळ पडते, तर दुसऱ्या नेत्याचं संपूर्ण पाच वर्षांचं राजकीय भविष्य एका छोट्याशा आकड्याने बदलून जातं!
मित्रांनो, जर आपण १९५१ पासून ते अगदी २०२४ च्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा सर्व डेटा तपासला, तर १९९५ चा हा १२ मतांचा विक्रम आजतागायत कोणीही मोडू शकलेलं नाही.
इतर काही निवडणुकांचा संदर्भ घ्यायचा झाला, तर:
१९७८ मध्येच नगर दक्षिण मतदारसंघातून जनता पक्षाचे डॉ. कुमार सप्तर्षी हे काँग्रेसचे बुद्धनाथ पोळ यांच्याविरोधात अवघ्या ३४८ मतांनी विजयी झाले होते.
१९७८ मध्ये शेवगावमधूनच कम्युनिस्ट पक्षाचे वकीलराव लंघे हे ९९५ मतांनी विजयी झाले होते.
२००४ मध्ये शेवगावमध्येच राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे भाजपच्या विठ्ठलराव लंघे यांच्याविरोधात ८०२ मतांनी जिंकले होते. आणि अगदी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात कमी मतांच्या फरकाची लढत झाली ती कर्जत-जामखेड मतदारसंघात! जिथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहित पवार यांनी भाजपचे प्रा. राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला.
या सर्व आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, बदलत्या काळानुसार मतदारांची संख्या वाढली, प्रचाराची माध्यमे बदलली, बॅलेट पेपर जाऊन ईव्हीएम आलं, तरीही अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांचा कौल अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात राहिला आहे.
तर मित्रांनो, हा होता अहिल्यानगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकांतील दोन सर्वात अविस्मरणीय आणि अटीतटीच्या लढतींचा इतिहास! १२ मतांनी जिंकलेले पांडुरंग अभंग असोत किंवा २४ मतांनी विजयी झालेले बाजीराव कांबळे असोत—या दोन्ही घटना आपल्याला लोकशाहीतील प्रत्येक एका मताची ताकद दाखवून देतात. आपल्या घरातील चार-पाच माणसं जर मतदानाच्या दिवशी आळस करून घरी बसली, तर एखाद्या चांगल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे.
तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती आणि विश्लेषण कसं वाटलं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच, १९५१ ते २०२४ दरम्यानच्या इतर एक हजार मतांच्या आतील १३ निवडणुकांवरही तुम्हाला सविस्तर व्हिडीओ हवा असेल, तर कमेंटमध्ये ‘Part 2’ असं नक्की लिहा. माहिती आवडली असेल तर व्हिडीओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार…





