
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूरमध्ये एका तरुण दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. बाळासाहेब पिसाळ आणि कीर्ती पिसाळ यांचे मृतदेह गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरात आढळले. मात्र, या दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
या घटनेतील काही बाबी संशय वाढवणाऱ्या आहेत. घटना घडली, त्यावेळी दाम्पत्याची दोन्ही लहान मुले देवीच्या मंदिरात जागरासाठी गेली होती, तर वृद्ध वडील घराबाहेर झोपले होते. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यांच्या भविष्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खासगी सावकाराच्या जाचातून हा प्रकार घडला का, की मृत्यूमागे आणखी काही कारण आहे? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आता पोलीस तपास आणि न्यायवैद्यक अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





