Latest

कौतुकास्पद ! ऊसतोड मजुराच्या लेकीची गगनभरारी… श्रीगोंद्याच्या धावपटूने क्रॉसकंट्री स्पर्धेचं मैदान मारलं, आता थेट राष्ट्रीय स्पर्धेत निवड !

घरची परिस्थिती बेताची, शिक्षणासाठी पैशांची चणचण आणि कुटुंब ऊसतोड मजुरी करणारे! पण म्हणतात ना, जिद्द असेल तर अडचणीही रस्ता सोडतात. याच जिद्दीच्या जोरावर एका लेकीने थेट राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत धडक मारली आहे.

ही गोष्ट आहे मराठवाड्यातील ऊसतोड मजूर कुटुंबातल्या सुरेखा मातनेची. श्रीगोंदे येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ती गेल्या तीन वर्षांपासून धावण्याचा सराव करतेय. आर्थिक अडचणींमुळे तिचं शिक्षण थांबण्याची वेळ आली होती. पण सुरेखाने हार मानली नाही. तिने धावण्याच्या मैदानावरच आपलं भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला.

आता नाशिकमध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत तिने प्रावीण्य मिळवलं. आणि याच कामगिरीच्या जोरावर तिची मंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली.

तिच्या वेगामुळे तिला ‘श्रीगोंदा एक्सप्रेस’ म्हणून ओळखलं जातं. प्रा. कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचं मार्गदर्शन, तसंच महाविद्यालयाची साथ तिला मिळाली.

आता ऊसतोड मजुराची ही लेक राष्ट्रीय स्तरावर धावणार आहे. कारण परिस्थिती पाय खेचत असली, तरी जिद्द असेल तर भरारी नक्कीच घेता येते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button