Latest

अहिल्यानगरमधील 14 दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या 9 सवलती मिळणार ? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी माहिती

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे ! जिल्ह्यातील १४ ही तालुके आता दुष्काळग्रस्त घोषित झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती लागू होणार आहेत.

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत आला. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने अहिल्यानगरमधील सर्व चौदा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सूट, कृषी वीजबिलात सवलत आणि कर्जवसुलीला स्थगिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ होणार आहे.

याशिवाय टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे वाढवणे आणि शेतपंपांचे वीज कनेक्शन न तोडण्याच्या उपाययोजनाही लागू होतील.

विशेष म्हणजे, या निर्णयांची अंमलबजावणी तालुकानिहाय तपासण्याची जबाबदारी विखे पाटील यांनी घेतली आहे. आता या सवलती प्रत्यक्षात किती लवकर पोहोचतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button