
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेनंतर आयोजित केलेल्या जेवणावळीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलीय.
सोमवारी आनंदधाम रोडवरील केशर गुलाब मंगल कार्यालयात तब्बल २ हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, हे जेवण पुरवणाऱ्या केटरर्सकडे FDA चा अधिकृत परवानाच नसल्याचं तपासणीत समोर आलं.
गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी सा. अ. मुल्ला यांनी दुपारी दोनच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी गुलाबजामचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला.
विशेष म्हणजे, संबंधित केटरर्सला नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना काम देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या माहितीनुसार, नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कलम ६३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. आता प्रश्न एवढाच, दोन हजार लोकांच्या जेवणाचं काम विनापरवाना केटरर्सला नेमकं कोणी दिलं?





